Home » अकोलेत दुध उत्पादकांची कामधेनू “अमृतसागर”ची रणधुमाळी सुरु15 जागांसाठी विक्रमी 96 उमेदवारी अर्ज दाखल

अकोलेत दुध उत्पादकांची कामधेनू “अमृतसागर”ची रणधुमाळी सुरु15 जागांसाठी विक्रमी 96 उमेदवारी अर्ज दाखल

अकोले ;- अगस्ती सहकारी साखर कारखाना आणि तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांपाठोपाठ दुधउत्पादकांची कामधेनू अशी बिरुदावली मिरविणा-या अमृतसागर सहकारी दुध संघाच्या निवडणूकीचा धुरळा उडाल्यानंतर पहिल्या दिवशी 15 जागांसाठी 64 आणि शेवटच्या दिवशी 32 मिळून एकूण 96 उमेदवारी अर्ज दाखल झाले.
11/11/2022 ते 17/11/2022 या कालावधीत अर्जविक्री आणि स्विकृती होईल.18 नोव्हेंबर रोजी छाननी झाल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी विधीग्राह्य नामनिर्देशन पत्राच्या सुची प्रसिद्धीनंतर 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र माघारीची प्रक्रिया पुर्ण होईल.6 डिसेंबर रोजी पात्र उमेदवारांना निशाणीचे वाटप होईल.18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडल्यानंतर दुपारी 4.30 वा मतमोजणी करुन निकाल घोषित करण्यात येईल.मतदान आणि मतमोजणीचे स्थळ योग्य वेळी जाहीर होईल.सर्वसाधारण मतदार संघ-10 जागा,महिला राखीव-2, इतर मागासवर्गीय-1, अनुसूचित जाती जमाती-1, विजाभज व विशेष मागास प्रवर्ग -1 मिळून 15 जागांसाठी निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिपक पराये यांनी दिली.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याची चुरशीची वाटणारी निवडणूक अखेरच्या टप्प्यात मतदारांनी एकतर्फी करुन टाकली होती.या निवडणुकीत माजी मंत्री मधुकरराव पिचड,माजी आमदार वैभव पिचड यांचेसहित संपुर्ण शेतकरी विकास मंडळाचा दारुण पराभव झाला.आमदार डॉ.किरण लहामटे,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम पाटील गायकर आणि जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांचे शेतकरी समृद्धी मंडळाचे सर्व उमेदवार दोन हजारांचे दरम्यान मताधिक्याने निवडून आले.विधानसभेपाठोपाठ पिचड पितापुत्राला या निवडणूकीतही मोठी हार पत्करावी लागली.आताची अमृतसागरची निवडणूकही त्यांचेसाठी सोपी वाटत असली तरी मतदारांच्या संपर्कात त्रुटी राहिल्यास तो भ्रमनिरासच ठरेल.कारण 130 मतदारांपैकी 85 मतदार महाविकास आघाडी म्हणजेच सिताराम पाटील गायकर यांचेशी एकनिष्ठ असल्याचा दावा आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते करतात.भाजपाचे नेते पिचड आणि त्यांचेसमवेत असणारांचाही असाच दावा असला तरी ‘वल्गना’ आणि प्रत्यक्ष ‘फिल्डवर्क’ यात मोठे अंतर असते.कारण हे सार्वत्रिक मतदान नसून ठरावाचे आहे आणि ठरावाच्या मतदानात सिताराम पाटील गायकर किती माहिर आहेत हे सांगायला नको.
आपल्या अवतीभवती ‘ गॅलॅक्टिकोस’ म्हणजे तारकापूंज(कार्यकर्त्यांचा) आहे या भ्रमातून माजी मंत्री आणि माजी आमदारांना बाहेरच यावे लागेल.निव्वळ वाचाळपणा समुहाचे ‘विजयी रसायन’ सादर करीलच असे नाही.आव्हान निराळे तसा तोडगाही निराळाच करावा लागतो.जुनेच तंत्र आणि जुनेच डावपेच असतील तर विजयाची अपेक्षा न केलेलीच बरी.राजकारणासहित इतरही सर्व क्षेत्रात आवश्यक तो बदल न केल्यास भूतकाळ आणि भविष्यकाळ ही दोनही पाती आपला वर्तमानकाळ कातरुन टाकतात हे एव्हाना ध्यानात यायलाच हवे.

भाजपा आणि महाविकास आघाडीसाठी अमृतसागरचे मैदान सज्ज झाले असून कोणता संघ दुधसंघ पकडीत घेतो हे लवकरच कळून येईल.

उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रमुख संभाव्य उमेदवार
——————-
विद्यमान अध्यक्ष वैभव मधुकरराव पिचड,उपाध्यक्ष वाकचौरे रावसाहेब रामराव,डुंबरे विठ्ठल केरुजी,मांडे सोपान काशिनाथ, गायकर अरुण दिनकर,धुमाळ गंगाराम पुंजा,बेणके सुभाष विठ्ठल,देशमुख प्रतापराव लक्ष्मण,देशमुख लताबाई अशोक,चौधरी शरद कारभारी,आंबरे रामदास किसन,वाकचौरे कैलासराव भास्कर,वाकचौरे दादापाटील रामभाऊ,नाईकवाडी प्रकाश संपत,कचरे नंदा सदाशिव,आवारी आप्पासाहेब दादापाटील,शेवाळे गुलाबराव पंढरीनाथ,चासकर विठ्ठल शंकर,तिकांडे रामहरी गोपीनाथ,वाकचौरे आनंदराव रामभाऊ,गडाख सुरेश संपत,शेवाळे विलास शहाजी, नवले महेश रमेश,चासकर विठ्ठलराव शंकर,औटी सुलोचना भाऊसाहेब,आरोटे रामनाथ काशीनाथ,भांगरे बाळासाहेब बाबुराव,कोटकर राधाकिसन यशवंत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *