Home » रुंभोडीतील त्या शिक्षकाचा गाडीची धडक देऊन केला खून

रुंभोडीतील त्या शिक्षकाचा गाडीची धडक देऊन केला खून

मा.श्री.प्रविण धुमाळ

इंदोरी – अकोले तालुक्यातील रुंभोडी  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक रवींद्र बबनराव उदावंत यांचा रोकड व अंगावरील दागिने लुटीच्या उद्देशाने  चार चाकी गाडीने धडक देऊन खून केल्याची घटना दीपावलीच्या सुट्टीत घडली. पारनेर पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तातडीने तपासाचे सूत्र हलवीत शिताफीने आरोपीला अटक केली आहे .ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेची पोलिसांनी दखल घेत पारनेर तालुक्यातील एका लोकप्रिय प्रतिष्ठानच्या तालुका अध्यक्षांच्या भावाला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की  मयत शिक्षक रवींद्र उदावंत हे नोकरी निमित्त अकोले येथे राहत होते. मात्र ते दिवाळीनिमित्त आपल्या मूळ गावी म्हणजेच वासुंदे रोड, टाकळी ढोकेश्वर, पारनेर येथे गेले होते. मयत उदावंत हे कसारे फाटा येथील दत्तात्रय शिर्के यांच्या जत्रा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. तेथेच उदावंत यांच्याकडील रोकड व अंगावरील सोन्याचे दागिने आरोपी दत्तात्रय शिर्के व अन्य एका साथीदाराने पाहिले. जेवण झाल्यानंतर मयत उदावंत आपल्या मोटरसायकल वरून कल्याण रस्त्याने कर्जुले हर्या शिवारातून आपल्या घरी जात असताना पाठीमागून पाठलाग करीत आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांना जाणून बुजून जोराची धडक दिली व त्यात ते गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.धडक दिल्यानंतर आरोपीने  उदावंत यांच्या  जवळील रोकड व दागिने घेऊन पलायन केले व पुन्हा थोड्या वेळाने घटनास्थळी येत अपघातग्रस्त ला मदत करीत असल्याचे नाटक केले. मात्र ती गाडी व त्यातील आरोपी यांना मयत उदावंत यांच्या अंगावरील दागिने व रोकड काढताना एका प्रत्यक्ष दर्शनीने पाहिले होते. पारनेर पोलिसांना ही माहिती  समजल्यानंतर पोलिसांनी अज्ञात वाहन चालक व  त्याच्या साथीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असतानाच खबऱ्याकडून पोलिसांना हा अपघात नसून घातपात असल्याची माहिती समजली. अपघाताच्यावेळी प्रत्यक्ष दर्शनीने  पोलिसांना व  उदावंत  त्यांच्या कुटुंबांना घटनाक्रम सांगितल्यानंतर पारनेर पोलिसांनी तपासाचे सूत्रे हलवीत दत्तात्रय शिर्के यांची चार चाकी गाडी ताब्यात घेतली व त्याला अटक केली.
नरेंद्र दगडू केदार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस कोठडीत असलेला आरोपी दत्तात्रय शिर्के याच्या एका साथीदाराचा पारनेर पोलीस शोध घेत आहे. पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप व त्यांच्या सहकाऱ्यांचे या तपासाबाबत कौतुक होत आहे.

………………………………………………………………..
मयत उदावंत हे रूंभोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी प्रिय शिक्षक होते .अतिशय मितभाषी मनमिळाऊ असलेल्या या शिक्षकांच्या मृत्यूने ऐन दिवाळीत अकोले तालुक्यातील शिक्षकांसह पालकांना विद्यार्थ्यांना ही त्यांचा मृत्यू चटका लावून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *