अकोलेतील खाजगी सावकारकी उठलीय नागरिकांच्या जीवावर. अनिल राक्षे,वाल्मिक आरोटे,राजू आभाळे यांच्या आत्महत्यांना जबाबदार कोण ?
अकोले – अकोले तालुक्याची ओळख ही क्रांतिकारकांचा व डाव्या चळवळीचा तालुका म्हणून अशी ओळख आहे.अकोलेतील खाजगी सावकारशाहीचा बिमोड आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे ते नवलेवाडीच्या कॉ.मुरलीमास्तर नवले यांनी समूळ केला.मात्र याच अकोले तालुक्यात खाजगी सावकारशाहीने डोके वर काढले असून सावकारांच्या जाचाला कंटाळून अनेकांनी मृत्यूला कवटाळले आहे.
अकोले शहरातील उद्योजक राजेंद्र आभाळे,जामगाव येथील वाल्मिक आरोटे त्यानंतर आता उंचखडक खुर्द येथील अनिल राक्षे या उच्चशिक्षित तरुणाने खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली.खरं तर यासारख्या अनेक घटना अकोले तालुक्यात घडल्या आहे.मात्र काही घटना या ना जनतेसमोर आल्या ना माध्यमांसमोर.अकोले शहरातील फळ विक्रेत्यांसह टपरीधारक नागरिक ही खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळले आहे.सकाळी पाचशे रुपये घ्यायचे अन संध्याकाळी व्याजासह आठशे किंवा नऊशे रुपयांची पठाणी वसुली करायची अशी सावकारकी ही अकोले शहरात सुरू आहे.

ही खाजगी सावकारकी करणारे लोकं ही कुणी वेगळे नसून ते आपल्यात बसणारेच आहे.अकोले शहरातील एका पतसंस्थेत या सावकार महोदयांचे सीसी खाते आहे.या खात्यातून या सावकारांची प्रतिदिन लाखो रुपयांची उलाढाल होते.हे सावकार स्वतः वसुली किंवा पैसे देण्यासाठी पुढे येत नाही.त्यांनी आपले विभागनिहाय एजंट नेमले आहे.ते एजंट एखादा बकरा शोधतात अन त्याला पैसे देतात.त्यानंतर मुद्दल बाजूला अन दर महिन्याला यांची व्याजाची गोळाबेरीज सुरू होते.पैसे घेतलेला माणूस व्याज भरून जाम होतो तेव्हा मुद्दल ही वेगळीच असते.
या सावकारांनी अकोले शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिक,छोटे मोठे ठेकेदार यांना पैसे दिले आहे.मात्र व्याजापोटी अव्वाच्या सव्वा रक्कम देऊनही सावकारांची भूक भागत नसल्याने ते उध्वस्त होतात अन आत्महत्या करण्या पर्यंत पोहोचतात.
अकोलेतील प्रवराकाठच्या काही सावकारांचे वसुली एजंट हे मध्यधुंद अवस्थेत पैसे घेतलेल्या नागरिकांना रात्री अपरात्री फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करतात.मध्यंतरी याच एजंटने दारू पिऊन एका इसमाला फोन करून तुझी पैसे द्यायची लायकी नाहीतर तुझी बायको…….वर बसव,अन माझे पैसे दे,अशी संतापजनक भाषा वापरली आहे.या एजंट लोकांची समोरच्या लोकांना खालच्या स्तरावर बोलण्याची इतकी लायकी देखील नाही.मात्र ते अकोलेतील काही साहेब,भाऊंच्या जीवावर उड्या मारीत आहे.
अकोले शहरातील उद्योजक राजेंद्र आभाळे यांच्या आत्महत्येलाही हीच चांडाळ चौकडी कारणीभूत आहे.अकोले पोलिसांनी या प्रकरणाचा त्यावेळी पाहिजे तसा तपास केला नाही.अन्यथा अकोलेतील सावकारकी त्यावेळेसच बंद झाली असती अन राजू आभाळेच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असता.

राजू आभाळे यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलीस ठाण्यात दाखल केलेला तक्रार अर्ज(यातील सावकारांची नावे आता दाखवलेली नाही)
अनिल राक्षे याची आत्महत्या ही खाजगी सावकारकीतूनच आहे.त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील नवले,आवारी,जगदाळे,कानवडे या आडनावाच्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.अनिल राक्षे याच्या आत्महत्येनंतर “पाटलांचा एक भाऊ आपलं वैभव” बंद करून गायब झाला आहे.खरंतर नुसता अनिल राक्षे नाहीतर राजू आभाळे व वाल्मिक आरोटे यांच्या ही आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे व दोषींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
आपल्यात मिसळणारे बसणारे हे सावकार सर्वांना ज्ञात आहे.मात्र आपल्या बोल बच्चनच्या जोरावर ते वेळ मारून नेतात.मात्र एखाद्याच्या घरातील कर्ता पुरुष गेल्यावर त्याची कुटुंबाची होणार वाताहत शब्दात मांडणे अशक्य आहे.
16 जणांना उसने पैसे देणारा अकोलेतील दानशूर सावकार
अकोलेतील एका सावकाराने अकोले न्यायालयात सुमारे 16 जणांवर कलम 138 प्रमाणे चेक बाऊन्सच्या केसेस केलेल्या आहेत.एखादा सर्वसामान्य नागरिक फार तर दोन ते चार जणांना उसने पैसे देऊ शकतो.मात्र या महाशयाने पैसे देताना रीतसर चेक व वकिलांच्या मार्फत नोटऱ्या करून घेतल्या आहे.त्यामुळे गरजवंत नागरिक वेळेवर पैसे देऊ न शकल्याने यांनी चेक बँकेत भरून बाऊन्स केला व रीतसर न्यायालयात दावा दाखल केला.इतक्या लोकांचे चेक बाऊन्स होतात व न्यायालयात दावा सुरू आहे,मग ही सावकारकी नाहीतर काय आहे.अकोलेतील हे सावकार राजकिय लोकांच्या सानिध्यात राहत असून वेळेला त्यांचा पाठिंबा घेत आहे. सध्या सोशल मिडियात एका सावकाराचा एक व्हिडीओ ही व्हायरल झाला आहे.
क्रमशः
श्री.अमोल शिर्के
संपादक अकोले टाईम्स