अकोलेत हॉटेलांवरील कारवाईत खाकीचे हात काळे !
अकोले पोलिसांनी दलालांच्या माध्यमातून खाल्ला मलिदा
अकोले :- अकोले शहरातील काही नामांकित हॉटेलांमध्ये कॉलेज तरुणांना एकांतात वेळ घालवता यावा यासाठी खास राजेशाही व्यवस्था करण्यात आली होती.अकोले पोलिसांनी नुकतीच शहरातील तीन हॉटेलांवर कारवाई करीत एकांतात अश्लील चाळे करणाऱ्या तीन जोड्यांना ताब्यात घेतले होते.मात्र ही कारवाई करताना अकोले पोलिसांनी थेट हॉटेल मालकांवर कारवाई न करता त्यांच्या मॅनेजरवर कारवाई करीत काही दलालांच्या मध्यस्थीने तोडपाणी करीत खाकीचे हात काळे केले आहे.

तालुक्यातील आदिवासी खेड्या पाड्यातील तरुण तरुणी महाविद्यालयीन उच्च शिक्षणासाठी अकोले शहरात दाखल होतात.याखेरीज आदिवासी आश्रमशाळा ही अकोले शहर अन परिसरात आहे.तसेच रोज इतर गावांहून अपडाऊन करणाऱ्या मुला मुलींची संख्या ही असंख्य आहे.कॉलेज सुटल्यानंतर नुकत्याच वयात आलेल्या मुलामुलींना भेटण्यासाठी एकांत पाहिजे असतो.त्यात हल्ली सगळयाच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असल्याने मोकळ्या ठिकाणी ही तरुणाई भेटू शकत नाही.मग काय अकोले शहरातील अनेक हॉटेल मालकांनी अलिशान अशी हॉटेल सजवली आहेत.पहील्या मजल्यावर किचन,दुसऱ्या मजल्यावर फॅमिलीसाठी जेवणाची व्यवस्था तर तिसऱ्या मजल्यावर तरुणाईसाठी कप्प्याकप्प्याचे बनविलेले स्वतंत्र दालन असा सेटअप अकोले शहरात काही हॉटेल चालकांचा आहे.तर काहींनी रस्त्याच्या कडेला असलेल्या आपल्या हॉटेलातील तळघरात एका बाजूला काचेचे पार्टिशन करून त्याला पडद्याच्या प्रेमाची झालर लावली आहे.तर भाजप कार्यालयासमोर तरुणाईला एकांतात बसण्याची “परफेक्ट” अशी व्यवस्था केली आहे.या हॉटेलमध्ये तर चार प्रकारच्या बसण्याच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत.तुम्ही ज्यावेळी हॉटेलात एन्ट्री कराल त्यावेळी तुम्हाला हॉटेलात सर्वत्र टेबल दिसतील.यानंतर काऊंटर शेजारी छोटे छोटे कॅबिन बनविण्यात आले आहे.या कॅबिनमध्ये ही तरुणाई गप्पा छप्पा अन नाष्टा करण्यासाठी एकत्र बसतात.या हॉटेलच्या पाठीमागील गाळ्यात तरुणाईला आकर्षित करण्यासाठी गर्द हिरवळीचा गालीचा बनविण्यात आला आहे.तरुणाई या ठिकाणी गर्द हिरवळीत कोल्ड कॉफीवर ताव मारीत आपले मन हिरवेगार ताजेतवाने करते.त्यानंतर तिसरा गाळा खास प्रेमी युगुलांसाठी बनविण्यात आला आहे.या गाळ्यात खास टप्प्याटप्प्याचे कप्पे बनविण्यात आले आहे.या कप्प्यांना छानपैकी पडदे लावण्यात आले आहे.त्यामुळे या कप्प्यांमध्ये तरुणाई मनसोक्त गुप्तगु करते.विशेष म्हणजे या कँडल कॅफे हे कुणाच्याही नजरेवर पडत नाही.त्यामुळे तरुणाईला खऱ्या अर्थाने एकांत या कॅफेत मिळतो.अनेक मातब्बर आडनावाच्या कोवळ्या मुली या कॅफेत आढळून आल्या आहेत त्या पण ऐऱ्या गैऱ्या मुलांसोबत.

अकोले शहरात या हॉटेल व कॅफेंच्या चर्चा अनेक दिवसांपासून चवीने सुरू होत्या.अकोले पोलीस ठाण्याचे तत्कालीन एपीआय मिथुन घुगे यांनी या कारवाईला प्रथमतः सुरुवात केली. कॅन्डल कॅफेतून एपीआय घुगे यांनी पोलीस नाईक सुयोग भारती,अविनाश गोडगे यांच्या माध्यमातून एका जोडप्याला ताब्यात घेतले होते.त्यानंतर मात्र एपीआय घुगे यांची काही दिवसांतच बदली झाल्याने त्यांना या प्रकरणी कारवाई करता आली नाही.त्यानंतर नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी हॉटेल पायल,हॉटेल पूजा व कॅन्डल कॅफेवर छापेमारी करीत तीन जोड्यांना ताब्यात घेतले.मात्र कारवाई करताना भोये साहेब यांनी जाणीवपूर्वक हॉटेल मालकांवर कारवाई न करता हॉटेल पायलचे मॅनेजर प्रथमेश सुखदेव लबडे,हॉटेल पूजाचे कुक रामदास किसन लोहकरे तर कॅन्डल कॅफेचे संचालक ऋषिकेश अरुण डावरे यांच्यावर कारवाई केली.मात्र ज्यांच्या नावे हॉटेल आहे त्यांच्यावर तसूभर ही कारवाई अकोले पोलिसांनी केली नाही.याउलट काही दलालांनी मध्यस्थी करीत हॉटेल मालकांचे नाव वगळण्यास लावले.त्यातून नवनियुक्त पीआय सुभाष भोये यांना पदार्पणातच मोठ्या धनाची सलामी मिळाली असल्याची चर्चा खुद्द हॉटेल मालकच आपल्या जिवलग मित्रांशी करीत आहे.

अकोले शहरासह तालुक्यात अनेक अवैध धंद्यांनी तोंडवर काढले असून हे धंदे मुळापासून उखडून टाकण्याची गरज आहे.मात्र पोलिसांनी कारवाई करताना कोणत्याही दलालांच्या हाताने मलिदा खाण्यापेक्षा स्वतः कडक कारवाई करण्याची गरज आहे.अकोलेचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी एपीआय भोये यांनी नुकत्याच केलेल्या कारवाईची चौकशी करून मूळ हॉटेल मालकांवर कारवाई का केली नाही याची चौकशी करणे गरजेचे आहे.अकोले शहरातील अजून ही अनेक नामांकित हॉटेलांमध्ये गुरूच्या आशीर्वादाने कृपा बरसत असून अकोले पोलिसांनी या हॉटेल मालकांना प्रसाद देण्याची गरज आहे.
श्री.अमोल शिर्के
संपादक,अकोले टाईम्स