उडदावणेत बिबट्या जाळला अन नखांची केली तस्करी !
अकोले ;- ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात बिबट्याची नखे विक्रीसाठी आणलेल्या तस्करांना अकोले तालुक्यातील उडदावणे याठिकाणी डोळखांब वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले आहे.या कारवाईत मुख्य आरोपी पांडुरंग बुधा उघडे (राहणार उडदावणे) यास शहापूर येथील सहाय्यक वनसंरक्षक भाग्यश्री पोले यांनी चोंढे नाक्यावर बनावट ग्राहक पाठवुन ताब्यात घेतले, तर त्याचा साथीदार भाऊ गांगड,काळु गिरे (दोघेही राहणार उडदावणे)या दोन आरोपींना त्यांच्या गावातून ताब्यात घेण्यात आले आहे.

शहापूर वनविभागाने केलेली ही कारवाई निश्चितच महत्वपूर्ण आहे.मात्र अकोले तालुक्यातील आदिवासी भागात बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांच्या तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.दरम्यान उडदावणे परिसरात 15 दिवसांपूर्वी हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता.या मृत बिबट्याची कोणत्याही प्रकारची माहिती कळसुबाई हरीचंद्रगड अभयारण्यातील एका ही अधिकाऱ्याला नव्हती.त्यामुळे उडदावणे गावातील आरोपींनी बिबट्याची नखे,कातडी आणि मिशा काढून घेत सदर बिबट्या जाळून टाकला.या घटनेची जराशीही खबर वन्यजीव विभागाला लागली नाही.
मात्र या घटनेतील आरोपींनी बिबट्याची नखे शहापूर परिसरात विक्रीला आणली असता शहापूर वनविभागाला या घटनेची कुणकुण लागली.शहापूर वनविभागाने सापळा रचित बनावट ग्राहक पाठवून बिबट्याची नखे विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

यापूर्वी पुणे जिल्ह्यातील आळेफाटा याठिकाणी बिबट्याचे कातडे विक्रीला आणणाऱ्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या.विशेष म्हणजे या घटनेतील आरोपी साजिद सुलतान मणियार (राहणार देवठाण),शरद मोहन मधे,रामनाथ येसु पथवे (दोघेही राहणार शेरणखेल) हे अकोले तालुक्यातील आहेत.या दोन्ही घटनांमुळे अकोले तालुक्यात वन्यजीवांच्या तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.

मात्र वनविभाग आणि वन्यजीव विभाग जाणीवपूर्वक या घटनांकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप वन्यजीव प्रेमी करीत आहे.आदिवासी अकोले तालुक्यात बिबटे,मोर,ससा,रानडुक्कर या वन्यप्राण्यांसह चंदनतस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.वनविभाग आणि वन्यजीव विभागाने वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे……….!


श्री.अमोल शिर्के
संपादक,अकोले टाईम्स