आज पहिल्यांदाच शेंडीतून उपाशीपोटी घरी आलोय…….!
अकोले तालुक्यातील शेंडीचं भांगरे घराणं हे राजकारणा बरोबरच समाजकारणात एक पाऊल पुढे असलेलं घराणं.भांगरे घराण्याला मोठा राजकीय वारसा लाभला आहे.स्वर्गीय गोपाळराव भांगरे,यशवंतराव भांगरे, राजाबापू भांगरे व आजच आपल्यातून गेलेले अशोकराव भांगरे अशी रत्ने या घराण्याने अकोले तालुक्याला दिली.
शेंडीत भांगरेंच्या घरी कुणी गेले अन तो चहा पाणी जेवण न करता उपाशीपोटी घरी आला,असा एक ही प्रसंग कार्यकर्त्यांना व सर्वसामान्य नागरिकांना आठवत नाही.भांगरे कुटुंबीयांचा फारसा इतिहास मला माहित नाही.मात्र जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक व शांताराम गजे सर यांच्याकडून अनेक गोष्टी ऐकल्या आहेत.शेंडीचे भांगरे कुटुंबिय तसे एक सदन कुटुंब.अनेक वर्षे घरात आमदारकी राहिल्यामुळे शेंडीत भांगरे कुटुंबाकडे कार्यकर्त्यांचा मोठा राबता राहत असे.अनेक कार्यकर्ते कामानिमित्त शेंडीत जायचे,यावेळी त्यांची जेवणाची व चहा पाण्याची सोय ही भांगरे कुटुंबाकडून मोठ्या आदरातिथ्याने केली जायची.भांगरे घराण्याची ही परंपरा गेल्या अनेक दशकांपासून अशीच सुरू आहे.भांगरे घराण्याच्या या परंपरेचा मी ही एक “स्नेहबंधक” आहे.मी सन 2011 साली ऑक्टोबर महिन्यात दैनिक सार्वमतला अकोले कार्यालयात उपसंपादक म्हणून रुजू झालो.यावेळी अकोलेतील अशोकराव भांगरे यांच्या निवासस्थानी माझी अन त्यांची ओळख जेष्ठ पत्रकार भाऊ मंडलिक यांनी करून दिली.पहिल्या भेटीतच त्यांनी माझा मोबाईल नंबर घेतला अन त्यांच्या मोबाईलमध्ये व मनामध्ये जतन करून ठेवला तो आजपर्यंत……..!

एक अभूतपूर्व आठवण दैनिक सार्वमत कार्यालयाच्या वर्धापनदिन सोहळ्यास अशोकराव भांगरे यांनी उपस्थिती लावली होती.यावेळी संपादक नंदकुमार सोनार,उपसंपादक अमोल शिर्के.
त्यानंतर आमचा अनेक कार्यक्रमांमधून एकमेकांशी संपर्क येत गेला.सुनिताताई भांगरे यांच्याशी ही परिचय झाला.मग भांगरे कुटुंबियांशी माझी खूपच जवळीक वाढत गेली.सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजपची युती तुटली अन अशोकराव भांगरे यांना भाजपची उमेदवारी मिळाली.अशोकरावांना उमेदवारी मिळवण्याकामी जालिंदर वाकचौरे यांनी शर्थीचे प्रयत्न केले.यावेळी देशात व राज्यात मोदी लाटेची हवा होती.अशोकराव भांगरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल,पंकजाताई मुंडे यांच्या जाहीर सभा पार पडल्या.अशोकराव भांगरे यांची ही निवडणूक मी सर्वाधिक जवळून अनुभवली.खरं सांगायचं झालं तर अशोकरावांच्या या निवडणूक प्रक्रियेत मुख्य प्रसिद्धी प्रमुखाच्या भूमिकेत मी होतो.निवडणुकीची धामधूम ऐन रंगात असताना सभांचे नियोजन,प्रचार यंत्रणा या गोष्टीसाठी रात्री उशिरा पर्यंत आम्ही जगायचो.त्यामुळे माझा जेवणाचा योग स्वतः अशोकराव भांगरे,जालिंदर वाकचौरे,शिवाजीराजे धुमाळ यांच्यासोबत असायचा. सुनिताताई भांगरे इतक्या गडबडीत ही आमच्यासाठी स्वतः जेवण बनवायच्या.या निवडणुकीत अशोकराव भांगरे यांना नेहमीप्रमाणे अपयश आले.
मात्र पराभवाने खचून न जाता परत लोकांमध्ये अशोकराव भांगरे यांचा राबता सुरू व्हायचा.निवडणूकीतील पराभवा नंतर दुसऱ्याच दिवशी हा जनसेवक पुन्हा जनतेच्या सुखदुखात सहभागी आसायचा.सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाला तरी अनेक जण गावात येत नाही.मात्र हा संघर्ष योद्धा सुमारे सहा वेळा पराभूत झाला तरी दुसऱ्या दिवशी लोकांमध्ये मिसळणारा हा जनतेच्या मनातील खरा आमदार होता.आजोबा आमदार,वडील आमदार मात्र मुलाला आमदार होता आले नाही,ही मोठी खंत त्यांच्या अन त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात कायमच काट्याप्रमाणे बोचत होती.

2019 साली अकोले तालुक्यातील राजकीय परिस्थिती बदलली.पिचडांनी भाजपात प्रवेश केला अन अशोकराव भांगरे यांनी नेहमीप्रमाणे पिचड ज्या पक्षात प्रवेश करतात त्या विरोधी पक्षात प्रवेश केला.शरद पवार,अजित पवार यांनी अकोले तालुक्यातील विरोधकांची वज्रमुठ बांधून या निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्याची रणनीती आखली.या निवडणुकीत पिचडांचे पारंपरिक विरोधक असलेल्या अशोकराव भांगरे यांना उमेदवारी न देता कट्टर पिचड विरोधक असलेल्या डॉ.किरण लहामटे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली.40 वर्षे ज्या पिचडांशी आमदारकीसाठी संघर्ष केला त्या पिचडांना आज चारी मुंड्या चित करून विधानसभेत जाण्याचे स्वप्न डोळ्यासमोर दिसत असताना त्यांना राष्ट्रवादी पक्षाने डॉ.किरण लहामटे यांचा प्रचार करण्याचा आदेश दिला.गेली 40 वर्षांची आपल्या तपश्चर्या बाजूला ठेवून अशोकराव भांगरे यांनी या निवडणुकीत तन मन धनाने उतरत डॉ.किरण लहामटे यांच्यासाठी मतदारसंघ पालथा घातला.या निवडणुकीत डॉ.किरण लहामटे हे मताधिक्याने निवडून आले.मात्र त्यांच्या विजयाचे श्रेय हे अशोकराव भांगरे यांना खऱ्या अर्थाने जाते.अशोकराव भांगरे या निवडणुकीत उतरले असते तर मत विभाजनामुळे पिचडांचा विजय सुकर झाला असता.मात्र अशोकराव स्वतः किंग न होता या निवडणुकीत “किंगमेकर” झाले.हल्ली कुणी ग्रामपंचायतची जागा दुसऱ्या कुणासाठी सोडत नाही मात्र या “राज्जोने” आपली 40 वर्षांची तपश्चर्या एका झटक्यात दुसऱ्यासाठी भंग केली.खरंच अशोकराव भांगरे यांचा हा त्याग शब्दात वर्णन करता येणार नाही.मला एकदा तरी पिचडांना पराभूत करायचे आहे असा मनोमनी चंग बांधलेल्या अशोकराव भांगरे यांचे स्वप्न अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीत पूर्ण झाले होते.या निवडणुकीत अगस्ती कारखान्यात सत्तांतर झाले अन अशोकराव भांगरे हे कारखान्याचे व्हॉइस चेअरमन झाले.

मात्र विजयाचा हा आनंद त्यांना जास्त दिवस घेता आला नाही.सर्व काही सुरळीत सुरू असताना नियतीने डाव साधला अन आदिवासींचा हा “राज्जो” आपल्याला सोडून गेला.
अशोकराव गेले ही बातमी माझ्या कानावर पडताच हातातील घास खाली पडला,काही सुचेनासे झाले.खरं सांगायचे झाले तर अंगात त्राण उरला नाही.कसेबसे ऑफिस गाठले,मात्र बातमीसाठी स्क्रिप्ट करताना हात थरथर कापत होते.ज्या अशोकरावांनी दोन दिवसांपूर्वी समशेरपूर येथे वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमात माझ्या खांद्यावर हात टाकला होता,त्याच अशोकरावांची निधन वार्ता करण्याची दुर्दैवी वेळ माझ्या हातांवर आली होती.मनातील भावनांना आवर घालत आवंढा गिळत बातमीला व्हॉइस दिला.अशोकराव गेले हे मान्य करायला मन तयार होत नव्हते.सव्वा बारा वाजता घरी जायला निघालो,समोर असलेल्या अगस्ती शाळेच्या पटांगणात एका मित्राच्या गळ्यात पडून भावनांना वाट मोकळी करून दिली.आज (शुक्रवारी) सकाळी अंत्यविधीसाठी शेंडीच्या दिशेने प्रस्थान केले.मनात माजलेली काहूर काही शांत होत नव्हती,अशोकरावांच्या आठवणी मनातून जात नव्हत्या.काय करावे सुचत नव्हते,म्हणतात ना जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला,अशी समज मनाला घालून अंत्ययात्रेत सामील झालो.अंत्ययात्रेत सामील झालेलो मी आज एक पत्रकार नव्हतो तर मी फक्त न फक्त एक दुःखी माणूस म्हणून सहभागी झालो होतो.आज पहिल्यांदा मला मी पत्रकार नसल्याची जाणीव अशोकराव भांगरेंच्या अंत्ययात्रेत झाली.अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर दोन किलोमीटर अंतर चालून अशोकरावांच्या निवासस्थानी पोहोचलो.अमितदादा,दिलीपरावांना नमस्कार केला अन गाडीच्या दिशेने निघालो.घराकडे पाठ फिरवून निघालो असता अशोकरावांची आठवण मनात दाटून आली.जे अशोकराव घरी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कधीही उपाशीपोटी पाठवित नव्हते,त्या अशोकरावांच्या घरून मी आज उपाशीपोटी निघालो होतो.माझे अशोकराव आज असते तर बळजबरीने त्यांनी मला काय सर्वांना जेवू घातले असते.सर्वांना जेवू घालणारा प्रेमाने आदरातीथ्य करणारा राज्जोच आज परलोकी गेलाय,
कसा व्यक्त होऊ कळत नाही.परमेश्वरा आमच्या आजी,सुनिताताई,अमितदादा,सोनाली,ऐश्वर्या,दिलीपराव यांना या दुःखातून सावर रे………..!

आठवणी
श्री.अमोल शिर्के
संपादक,अकोले टाईम्स
सह्याद्रीचा सुपुत्र विसावला भंडारदऱ्याच्या कुशीत,अशोकराव भांगरे अनंतात विलीन
M | T | W | T | F | S | S |
---|---|---|---|---|---|---|
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
29 | 30 | 31 |